सध्या सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ८०० ते १००० लोकांच्या जमावाने दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घृणास्पद घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. आता राष्ट्रीय महिला आयोगानं याची दखल घेतली असून सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ फ्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचा आदेश महिला आयोगानं दिला आहे.

हेही वाचा- Manipur Horror: दोन महिलांना नग्न करत काढली धिंड, सामूहिक बलात्काराचा आरोप

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) ने ट्विटर इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुखांना संबंधित व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिलांना नग्नावस्थेत धिंड काढणं ही लज्जास्पद बाब आहे. या व्हिडीओंमधून पीडित महिलांची ओळख सार्वजनिक होत आणि हा दंडनीय गुन्हा आहे, असं महिला आयोगानं आदेशात म्हटलं आहे.

खरं तर, गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. आता येथील हिंसाचाराने क्रूरतेचा कळस गाठला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आहे. एवढंच नव्हे तर जमावाने संबंधित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ४ मे २०२३ रोजी ही घटना घडल्यानंतर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 women made naked and paraded by mob in manipur national women commission direct twitter to remove video rmm