Kid Did Not Want to Leave Kidnapper Viral Video: राजस्थानच्या जयपूरमध्ये स्थानिक पोलिसांनी मोठ्या हिकमतीनं एका गुन्ह्याचा छडा लावला. एका चिमुकल्याची पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. त्याला त्याच्या आई-वडिलांकडेही सोपवलं. पण पुढे घडलेल्या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले. या मुलाला अपहरणकर्त्यापासून सोडवल्यामुळे त्याला आनंद होण्याऐवजी ते मूल ओक्साबोक्शी रडू लागलं. अपहरणकर्त्याकडेच राहण्याचा हट्ट धरू लागलं. शेवटी रडता रडताच त्या मुलाला पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांकडे सोपवलं! या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
एखाद्या सिनेमात शोभून दिसावा तसाच हा प्रसंग जयपूर पोलिसांना नुकताच अनुभवायला मिळाला. बुधवारी २८ ऑगस्ट रोजी जयपूर पोलिसांनी एका दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणाचा छडा लावला. या चिमुकल्याचं १४ महिन्यांपूर्वी अपहरण झालं होतं. तेव्हा त्याचं वय ११ महिने होतं. याची रीतसर तक्रार जयपूरच्या सनगनेर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस आरोपींच्या शोधात होते. अखेर बुधवारी पोलिसांनी अपहरणकर्त्याचा शोध लावून त्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली.
साधूच्या वेषात राहात होता आरोपी!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी वृंदावनच्या परिक्रमा मार्गावर एका झोपडीमध्ये साधूच्या वेशात राहात होता. आपली ओळख लपवण्यासाठी त्यानं दाढीही वाढवली होती. तनुज चहर असं या आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशच्या आग्र्याचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे तनुज हा अलिगढच्या राखीव पोलीस दलात हवालदार म्हणून काम करत होता. पण गेल्या दोन वर्षांपासून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. पोलिसांच्या तपासाची पद्धत पूर्णपणे माहिती असल्यामुळे तनुजनं गेल्या दीड वर्षांत त्याचा मोबाईल फोन वापरलाच नव्हता. शिवाय, पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी तो त्याचं ठिकाण बदलत राहायचा.
आरोपीची मोडस ऑपरेंडी!
तनुज चहर पोलिसांपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहायचा. शिवाय, एकाच ठिकाणी तो पुन्हा कधीच जायचा नाही. नव्या लोकांशी तनुज फारशा गाठीभेटी आणि ओळख वाढवत नव्हता. पृथ्वी हा आपलाच मुलगा आहे, असंच तो आसपासच्या लोकांना सांगत असे.
…आणि तनुज पोलिसांच्या तावडी सापडला!
२२ ऑगस्ट रोजी पोलिसांचं एक विशेष पथक मथुरा, आग्रा आणि अलिगढमध्ये तपासासाठी गेलं होतं. तनुज चहरबाबत पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली होती. तनुजनं दाढी वाढवली असून तो वृंदावन परिक्रमा मार्गावर एक झोपडी बांधून तिथे राहात असल्याचं पोलिसांना समजलं होतं. आपण साधू असल्याचं त्यानं आसपासच्या लोकांना सांगितलं होतं. पोलिसांनी त्याच्याच पद्धतीने त्याला सापळ्यात अडकवलं.
काही पोलीस स्वत: साधूच्या वेशात त्या परिसरात राहू लागले. रोज आध्यात्मिक गाणी म्हणत त्या परिसरात फिरू लागले. २७ ऑगस्ट रोजी त्यांना माहिती मिळाली की तनुज अलिगढला पळाला आहे. पोलिसांचं पथक अलिगढला दाखल झालं असतानाच तनुजनं तिथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तब्बल ८ किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि शेवटी त्याला अटक केली.
चिमुकल्याच्या आईशी आरोपीची ओळख
दरम्यान, पोलिसांच्या तपासात आणखीही काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तनुजला चिमुकल्या पृथ्वीसोबत त्याच्या आईलाही स्वत:बरोबर ठेवायचं होतं. पण त्याच्या आईनं या गोष्टीस नकार दिला होता. त्यामुळेच तनुजनं त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने चिमुकल्या पृथ्वीचं अपहरण केलं. यादरम्यान, तनुज चिमुकल्याच्या आईला धमकावतही होता, अशी माहिती समोर आली आहे.