वादाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे. सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांनी २० बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचाही यात समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून नव्या सीबीआय प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच सीबीआयचे हंगामी संचालक नागेश्वर राव यांनी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. राव यांनी बड्या २० अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. यामध्ये १३ पोलीस अधीक्षक दर्जाचे तर ७ सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे २४ जानेवारी रोजी नव्या सीबीआयच्या प्रमुखांच्या निवडीसाठी बैठक घेणार आहेत.
ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये पोलीस अधीक्षक विवेक प्रियदर्शनी यांचाही समावेश आहे. ते 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करीत असून महत्वपूर्ण दिल्ली युनिटची जबाबदारी सांभाळत होते. बदल्या करण्यात आलेल्या इतरांमध्ये एटी दुरईकुमार, प्रेम गौतम, मोहित गुप्ता (राकेश अस्थानांच्या जागेवर यांना इनचार्ज बनवण्यात आले होते) या महत्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, नागरेश्वर राव यांनी केलेल्या बदल्यांविरोधात सीबीआयचे अधिकारी ए. के. बस्सी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. आलोक वर्मा यांनी पुन्हा सीबीआयचे प्रमुखपद स्विकारल्यानंतर त्यांनी केलेल्या बदल्यांचा निर्णय रद्द करण्यात आला होता. यावेळी बस्सी यांची बदली पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली होती.