20 Elephants in Anant Ambanis Vantara : अरुणाचल प्रदेशातील वृक्षतोड उद्योगातून २० हत्तींची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये १० नर, ८ मादी, १ किशोर आणि १ शावक आहे. यांना आता अनंत अंबानींनी स्थापन केलेल्या वन्यजीव बचाव केंद्र वंतारा या येथे हलवण्यात येणार आहे. तिथे ते पूर्णपणे सुरक्षित असणार आहेत. वंतारा हे हत्तींसह अनेक वन्यप्राण्यांसाठी बचाव केंद्र आहे.
हे बचावकार्य त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने करण्यात आले. याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्य दिली. हे बचावकार्य हत्तींच्या सध्याच्या मालकांच्या पूर्ण संमतीने पार पडले. या हत्तींना लवकरच वंतारामध्ये त्यांचे कायमचे घर मिळणार आहे. वंतारामध्ये प्राण्यांना नैसर्गिक वातावरण मिळतं, यामुळे हत्ती येथे त्यांच्या मूळ निवासस्थानासारखेच राहू शकतील. येथे त्यांना साखळदंडापासून मुक्त ठेवण्यात येणार आहे, तसंच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची मजुरीची सक्ती केली जाणार नाही. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
लक्ष्मीची कर्मकहाणी
सुटका केलेल्या या हत्तींची कहाणी खूप वेदनादायी आहे. क्रूरतेचा बळी ठरलेली लक्ष्मी ही त्यापैकीच एक आहे. लक्ष्मी ही दहा वर्षांची हत्तीण तिच्या मागच्या पायावर भार सहन करू शकत नाही. तिच्या पायावर खोल आणि न दिसणाऱ्या जखमा आहेत. इतकंच नाही तर त्याच्या उजव्या कानाच्या बाहेरील भागात एक इंचाचे ताजे आणि वेदनादायक छिद्र आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या क्रूर प्रयत्नादरम्यान तिच्यावर या जखमा झाल्या.
माया या दोन वर्षांच्या हत्तीच्या बाळाचा जन्म बंदिवासात झाला. तिची आई रोंगमोती हिच्यासोबत तिची सुटका करण्यात आली, तिने लाकूडकाम करताना दीर्घकाळ परिधान केलेल्या हार्नेसमुळे तिच्या छातीवर मोठ्या जखमा झाल्या होत्या. त्यापैकी रामू नावाचा नर हत्तीही सापडला, ज्याचे पुढचे आणि मागचे पाय घट्ट बांधलेले होते. हे सर्व ४-६ महिने त्याच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केले गेले, ज्यामुळे त्याला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास झाला.