एका अल्पवयीन मुलीची दिल्लीत अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर चाकूचे २० वार करण्यात आले. तसंच नंतर दगडाने ठेचून तिला ठार करण्यात आलं. या प्रकरणी या मुलीला मारणाऱ्या साहिल नावाच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. बुलंदशहरमधून आज दुपारी त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या घटनेत हा साहिल नावाचा मुलगा त्या मुलीला भोसकतो आणि दगड डोक्यात घालून तिची हत्या करतो हे दिसतं आहे. शिवाय आजूबाजूने लोक जात आहेत पण कुणीही तिला वाचवत नाही किंवा त्या मुलाला अडवत नाहीत हेदेखील स्पष्ट दिसतं आहे.
काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये?
जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे त्यामध्ये साहिल नावाचा हा मुलगा मुलीवर २० वार करताना दिसतो आहे. चाकूचे वीस वार करुनच तो थांबत नाही. तर तो या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात दगडही घालताना दिसतो आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली आहे?
साहिलला आम्ही बुलंदशहरमधून अटक केली आहे. तो एसी, तसंच फ्रिज रिपेअरिंगची कामं करतो. आमचा पुढील तपास सुरु आहे. तसंच त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुमन नलवा यांनी दिली आहे. तर पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी हे सांगितलं आहे की साहिलला आम्ही अटक केली आहे. जे काही पुरावे या प्रकरणात आहेत ते आम्ही गोळा केले आहेत. तसंच त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत.
पीडितेच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?
मी माझ्या मुलीला पाहिलं तेव्हा तिच्या पोटात चाकूचे अनेक वार झाले होते. दगडामुळे तिच्या डोक्याचे चार तुकडे झाले होते. साहिल नावाच्या मुलाने ही हत्या केली आहे. त्या दोघांच्या मैत्रीबाबत मला काही माहित नाही. आम्ही तिला सोबत घेऊन जात होतो तेव्हा कधीही तिला कुणीही छेडछाड केली नाही. तसंच या दोघांमध्ये काही ओळख होती वगैरे मला माहित नव्हतं. ANI शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
त्यानंतर पीडितेचे वडील म्हणाले, साहिल शाहबाद डेअरी भागातच तो राहतो. माझी मुलगी शाळेत जात होती. माझ्या मुलीला अत्यंत निर्घृणपणे मारण्यात आलं. तिची हत्या करणाऱ्यालाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. असं करण्याची कुणाची हिंमत पुन्हा होता कामा नये इतकं कठोर शासन त्याला झालं पाहिजे अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे.