father sentenced for child abuse Crime News : चेन्नईमध्ये एका महिलेने सिंगापुरहून केलेल्या फोन कॉलमुळे एका अल्पवयीन मुलीवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत धक्कादायक खुलासा झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात या प्रकरणात या मुलीच्या वडीलांना ट्रायल कोर्टाने २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या घटनेबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये पाच वर्षाची असताना या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. आई कामावर गेलेली असताना तिच्या बांधकाम व्यावसायिक वडीलांनी आंघोळ घालत असताना लैंगिक अत्याचार केले.
मुलीने सुरुवातीला तक्रार करण्यास सुरूवात केल्यानंतर पती-पत्नीमध्ये यावरून सतत वाद होऊ लागले, पण पुढील वाद टाळण्यासाठी त्या महिलेने गप्प राहण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर तिच्या अनुपस्थितित हे अत्याचार चालूच राहिल्याचे त्या मुलीच्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने तिच्या मुलीला चैन्नईतील त्यांच्या घरापासून ३०० किलोमीटर दूर अंतरावर राहाणाऱ्या एका नातेवाईकाकडे पाठवून दिले. पण तेथे मुलीच्या आईच्या मोठ्या बहिणीने म्हणजेच मुलीच्या मावशीने एका दिवशी सिंगापूरहून तिला फोन केला आणि हा धक्कादायक प्रकार उजेडात आला.
मुलीने मावशीला काय सांगितलं?
या संभाषणादरम्यान या लहान मुलीने तिच्या मावशीला सांगितले की, आता छळ सहन करावा लागत नसल्याने आता कुठेतरी ती आनंदी आहे. तिने असं म्हटल्याने काळजीत पडलेल्या मावशीने तिची प्रेमाने चौकशी केली आणि त्यानंतर मुलीने तिच्याबरोबर घरी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीची मावशी ताबडतोब तमिळनाडू येथे आली आणि मुलीला घेऊन रुग्णालयात पोहचली. तिच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिला शारीरिक इजा झाल्याचे दिसून आले.
यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यात आला आणि याप्रकरणी मुलीच्या वडीलांना अटक देखील करण्यात आली. पण पुढे मुलीने जबाब मागे घेतले. २०२३ मध्ये खटला सुरू असताना मुलीच्या आईने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मुलाचा ताबा मिळवला. जबाब मागे घेतला असला तरी मुलाच्या साक्षीच्या आधारे ट्रायल कोर्टाने वडीलांना जामीन देण्यास नकार दिला , असे विशेष सरकारी वकील एस. अनिता यांनी सांगितले.
पुढच्या वर्षभरात आईने मुलीला तिने यापूर्वी दिलेले जबाब मागे घेण्याबद्दल शिकवल्याचा आरोप आहे. यादरम्यान न्यायालयाने मुलीला दर आठवड्याला तिच्या मावशीकडे जाण्याची परवानगी दिली, मात्र तिचा ताबा हा तिच्या आईकडेच राहिला.
अखेर गेल्या आठवड्यात जेव्हा हा खटला सुनावणीसाठी कोर्टासमोर आला तेव्हा, सुरुवातीला तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल माहिती देणार्या मुलीने काही घडलेच नाही असा धक्कादायक दावा केला. तसेच तिने तिच्या वडीलांसह तिच्या संपूर्ण कुटुंबाने एकत्र राहावे अशी आपली इच्छा आहे असं न्यायालयात सांगितलं.
अखेर शिक्षा झालीच…
मुलाने तिचा जबाब मागे घेतल्यानंतरही, ट्रायल कोर्टाने वैद्यकीय पुरावा आणि तिच्या मूळ जबाबावर विश्वास ठेवला आणि न्यायाधीश एम. राजलक्ष्मी यांनी त्या मुलीच्या वडिलांना २० वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपये दंड ठोठावला.