परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंचं प्रमाण वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील बोस्टनमध्ये आता आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परंतु, या मृत्यूमागचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. भारतीय वाणिज्य दुतावासाने एक्सवरून ही माहिती दिली.
“बोस्टनमधील भारतीय विद्यार्थी अभिजीत परुचुरू यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल जाणून अतिशय दु:ख झाले”, असे न्यू यॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. परुचुरुचे पालक सरकारच्या संपर्कात आहेत. वाणिज्य दूतावासाने सांगितले की त्यांनी विद्यार्थ्याच्या पार्थिव भारतात आणण्यासाठी मदत केली. ते या प्रकरणात स्थानिक अधिकारी तसेच भारतीय-अमेरिकन समुदायाच्या संपर्कात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय परुचुरु यांच्यावर आंध्र प्रदेशातील तेनाली या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यूएस स्थित ना नफा संस्था TEAM Aid ने त्यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत केली होती. २०२४ च्या सुरुवातीपासून यूएसमध्ये भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे किमान अर्धा डझन मृत्यू झाले आहेत. हल्ल्यांच्या संख्येत झालेल्या चिंताजनक वाढीमुळे भारतीय समुदायामध्ये चिंता निर्माण झाली आहे.
मार्चमध्ये, भारतातील ३४ वर्षीय प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आणि वॉशिंग्टन विद्यापीठाचा विद्यार्थी अमरनाथ घोष यांची सेंट लुईस, मिसूरी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कुचीपुडी आणि भरतनाट्यम नृत्यांगना घोष यांनी त्यांच्या नृत्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधून अमेरिकेत स्थलांतर केले होते. सेंट लुईस अकादमी आणि सेंट्रल वेस्ट एंड शेजारच्या सीमेजवळ त्यांच्यावर गोळीबार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.