पीटीआय, चंडीगड : हरियाणामध्ये सोमवारी उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी शुक्रवापर्यंत एकूण २०२ लोकांना अटक करण्यात आली असून इतर ८० जणांना प्रतिबंधक उपाय म्हणून स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी शुक्रवारी दिली. हिंसाचारप्रकरणी १०२ एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यापैकी जवळपास निम्म्या नुह जिल्ह्यात नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नुहव्यतिरिक्त गुरुग्राम, फरीदाबाद आणि पालवाल जिल्ह्यांमध्येही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत उसळलेल्या हिंसाचाराचा तपास सुरू असून त्यामध्ये सहभागी असलेल्यांपैकी कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही विज यांनी अंबाला येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जात आहे. शुक्रवारची नमाज शांततेत पार पडावी यासाठी पुरेशी सुरक्षाव्यवस्था ठेवण्याच्या सूचना नुह, फरीदाबाद आणि गुरुग्राम जिल्ह्यांच्या उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित राज्यातही पुरेशी सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केल्याची माहिती विज यांनी दिली. तसेच समाजमाध्यमांवरही लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणामध्ये सोमवारी उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत दोन गृहरक्षक आणि एका नायब इमामासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
पानिपतमध्ये समाजकंटकांकडून दुकानांची नासधूस
हरियाणातील पानिपतमध्ये अज्ञात लोकांनी गुरुवारी संध्याकाळी एका दुकानाची नासधूस केली. नुहमधील हिंसाचारात मरण पावलेल्या एका व्यक्तीच्या घराजवळ हे दुकान होते अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. समाजकंटकांनी चिकनची विक्री करणाऱ्या दुकानाची नासधूस केली तसेच जवळपास उभ्या असलेल्या दोन वाहनांचेही नुकसान केले. या भागात पोलीस तैनात करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथील रहिवाशांनी सांगितले की, त्या भागातील लोक सौहार्दाने राहतात. तेथील शांतता भंग करण्यासाठी समाजकंटकांनी आमच्या भागाला लक्ष्य केले असे रहिवाशांनी सांगितले. पटौदी भागामध्ये गुरुवारी रात्री तीन मोटारसायकलींना आग लावण्यात आली. या मोटारसायकली एका दुकानाबाहेर उभ्या करण्यात आल्या होत्या आणि दुकानात मेकॅनिक झोपला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली आणि आतील मेकॅनिकची सुटका केली.
पोलीस अधीक्षकाची बदली
नुह जिल्ह्यामध्ये जातीय हिंसा सुरू असताना रजेवर गेलेले पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांची बदली करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. सिंगला यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त प्रभार सांभाळणारे नरेंद्र बिजारणिया यांच्याकडे आता नुह जिल्ह्याच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून सिंगला हे भिवानीचे पोलीस अधीक्षक असतील. यासंबंधी ३ ऑगस्ट रोजी आदेश काढण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) टी व्ही एस एन प्रसाद यांनी सांगितले.