मातृताऱ्यांशिवाय ग्रहांची निर्मिती होऊ शकते, एवढेच नव्हेतर आपल्या आकाशगंगेत सौरमालेच्या बाहेर असे किमान २०० अब्ज  ग्रह आहेत. त्यांचा जन्म ताऱ्यांशिवाय झालेला आहे.
आतापर्यंत वैज्ञानिकांचे असे मत होते, की ताऱ्यांभोवती न फिरणारे ग्रह हे भरकटलेले ग्रह असतात व सध्याच्या ग्रहमालेतून ते बाहेर फेकले गेलेले असतात. परंतु प्रत्यक्षात तसे नाही, सर्वच भरकटलेले मुक्त ग्रह हे ग्रहमालेतून बाहेर फेकले गेलेले नसतात तर त्यांचा जन्म मातृताऱ्याशिवाय स्वतंत्रपणे झालेला असू शकतो. संशोधकांना अवकाशात लहान काळसर ढग दिसले असून ते अशा मुक्तपणे विहरणाऱ्या ग्रहांचे अस्तित्व दर्शवतात. हे ग्रह मातृताऱ्याशिवाय तयार झाले असून मुक्तपणे विहार करीत आहेत. स्वीडन व फिनलंड या दोन देशांमधील दुर्बिणींनी मोनोसेरॉस या तारकासमूहात असलेल्या व पृथ्वीपासून ४६०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या रॉसेट नेब्युलाचे निरीक्षण केले आहे. त्यातून काही नवीन माहिती हाती आली आहे.
स्टॉकहोम विद्यापीठातील खगोलवैज्ञानिक गोस्टा गॅम यांनी सांगितले, की रॉसेट नेब्युला हे अशा लहान काळसर ढगांचे जन्मस्थान असून त्यांना ग्लोब्युलेटस असे म्हणतात. ते अतिशय लहान असून त्यांचा व्यास सूर्य व नेपच्यून यांच्यातील अंतराच्या पन्नास पटींनी कमी आहे. याअगोदर आमचा असा अंदाज होता, की त्यांचे ग्रहीय वस्तुमान गुरूच्या वस्तुमानापेक्षा तेरा पटींनी कमी असावे, त्या लहान पदार्थाचे वस्तुमान व घनता आम्ही मोजली आहे. ते एकमेकांच्या तुलनेत कशा गतीने फिरतात हे तपासले आहे. ग्लोब्युलेटस हे घन, आटोपशीर आकाराचे व घन गाभा असलेले आहेत. त्यातील काही त्यांच्या वजनाने कोसळतील व त्यांच्यापासून मुक्त विहरणारे ग्रह तयार होतील, त्यांच्यातील जास्त वस्तुमानाच्या ग्लोब्युलेटसपासून तपकिरी रंगाचे बटू ग्रह (ब्राऊन ड्वार्फ) तयार होतील, असे चामर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॅरिना पेरसन यांनी सांगितले. ब्राऊन ड्वार्फना काही वेळा अपयशी तारे म्हणतात, त्यांचे वस्तुमान ग्रह व तारे यांच्या दरम्यान असते.
ग्लोब्युलेटस – मुक्त ग्रहांचा मूळ स्रोत
छोटे काळसर ढग हे ताशी ८०००० कि.मी. वेगाने रॉसेट नेब्युलातून बाहेरच्या दिशेने जात आहेत. हे छोटे वाटोळे ढग हे वायूच्या मोठय़ा स्तंभातून फुटून बाहेर पडलेले असावेत. आकाशगंगेच्या इतिहासात असे रॉसेटसारखे लाखो तेजोमेघ तयार झाले व नंतर अस्तंगत झाले. त्यातून ग्लोब्युलेटसची निर्मिती झाली. ते ग्लोब्युलेटस हे मुक्तपणे विहरणाऱ्या ग्रहांचा मूळ स्रोत आहे.

Story img Loader