पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका सार्वजनिक रुग्णालयाच्या छतावर कुजलेल्या अवस्थेतील २०० अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलतानच्या ‘निश्तार’ रुग्णालयाच्या शवागाराच्या छतावरुन हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे मृतदेह छतावर गिधाडांसाठी ठेवण्यात आल्याची अफवा पाकिस्तानात पसरली आहे. मृतदेह बेपत्ता व्यक्तींचे असू शकतात, असा दावा बलुच फुटीरतावाद्यांनी सोशल मीडियावर केला आहे.
हॅरी पॉटरचा ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड; रॉबी कॉलट्रेन यांचे ७२ व्या वर्षी निधन
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी पंजाबचे मुख्यमंत्री परवेझ इलाही यांनी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. विशेष आरोग्य सचिव मुझमिल बशीर यांच्या अध्यक्षतेखालील या सहा सदस्यीय समितीला तीन दिवसात तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार चौधरी झमान गुज्जर यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे. या दरम्यान त्यांना छतावर ३५ मृतदेह आढळून आले आहेत. पुरुषांसह महिलांचे हे मृतदेह नग्न अवस्थेत असल्याची माहिती गुज्जर यांनी दिली आहे. या प्रकाराबाबत गुज्जर यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता हे मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी वापरण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक केंद्र; परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखींनी ठणकावले
गेल्या ५० वर्षांत अशाप्रकारचे भीषण दृश्य पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया या रुग्णालयाच्या भेटीनंतर गुज्जर यांनी दिली आहे. “या सडलेल्या मृतदेहांचे गिधाडे लचके तोडत होती. जर हे मृतदेह वैद्यकीय कारणांसाठी वापरले जात असतील, तर त्यानंतर त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यविधी व्हायला पाहिजे”, असे गुज्जर यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेतील दोषींवर कडक कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.