मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, दिवसागणिक याठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होते. देशातीलच नाही तर जगभरातील कंपन्या आणि नामांकित ब्रँड आपला व्यवसाय भारतात विस्तारताना मुंबईला प्राधान्य देताना दिसतात. यामध्ये आणखी एक भर पडली आहे. इंग्लंडमध्ये जवळपास २०० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या एका ऐतिहासिक लक्झरी ब्रँडने आपले देशाबाहेरचे पहिले दुकान उघडण्यासाठी मुंबईला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Thomas Goode & Co हे या ब्रँडचे नाव आहे. या कंपनीची स्थापना इंग्लंडमध्ये १८२७ मध्ये करण्यात आली होती.

राणी व्हिक्टोरियाबरोबरच त्यांनी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचाही रॉयल कारभार सांभाळला. आता त्यांचे लंडनमध्ये १८०० स्क्वेअर फूटांचे जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेले दुकान असून त्याठिकाणी असंख्य काचेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आता या ब्रँडला आपला व्यवसायाचा विस्तार करायचा असून २०० वर्षांनी त्यांनी यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे. पंचतारांकीत ऑबेरॉय हॉटेलमध्ये ते आपले दुकान सुरु करत आहेत. भारत हे सध्या दिवसेंदिवस वाढत असलेले आणि ताकदवान मार्केट आहे. त्यामुळे आम्ही भारतात विस्तार करायचा विचार करत आहोत असे ब्रिटीश इनव्हेस्टर आणि बिझनेसमन जॉनी सँडेलसन यांनी सांगितले.

या ब्रँडच्या टेबलवर वापरल्या जाणाऱ्या गोष्टी जास्त प्रसिद्ध असून त्या ब्रिटीश संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. Fortnums आणि Smythson या स्पर्धक कंपन्यांनी मध्यमवर्गीयांना परवडेल अशी उत्पादने बाजारात आणली असताना Thomas Goode & Co यामध्ये मागे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारतात या ब्रँडच्या वस्तूंचे आणि त्यावरील हस्तकलेचे कौतुक होईल असा विश्वासही कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. लंडनमधील मूळ दुकानात असलेल्या जास्तीत जास्त वस्तू या भारतातील दुकानात असतील याची आम्ही काळजी घेऊ असेही कंपनीव्दारे सांगण्यात आले आहे. पण या ब्रँडने अशाप्रकारे मुंबईला प्राधान्य दिल्याने व्यवसायासाठी मुंबई हे एक उत्तम लोकेशन असल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे.