भारतीय क्रिकेट संघाला पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा आपल्या सर्वांना आठवत असेल. जोगिंदर शर्मा यांनी अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या हातातील सामना हिसकावला होता. जोगिंदर शर्मा यांनी कालांतराने हरियाणा पोलिस दलात पोलिस उप-अधिक्षक पदावर नोकरी स्वीकारली होती. या पदावर काम करत असताना आता त्यांना एका प्रकरणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका तरूणाच्या आत्महत्येस जबाबदार ठरवून त्यांच्यासह सहा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ते सध्या हिसारचे पोलिस उप-अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
हरियाणामधील हिसार जिल्ह्यात असेलल्या आझाद नगर पोलिस ठाण्यात सदर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिसार जिल्ह्याच्या डाबडा गावातील २७ वर्षीय पवन नामक तरुणाने संपत्तीच्या वादातून आत्महत्या केली. पवनच्या कुटुंबियांनी गुरुवारी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत हिसारमधील मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. ॲट्रोसिटीच्या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीवर कुटुंबिय ठाम होते. पोलिस अधिक्षक राजेश कुमार मोहन यांनी सांगितले की, आरोपींवर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि ॲट्रोसिटीच्या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
प्रकरण काय आहे?
डाबडा गावातील आत्महत्या करणाऱ्या पवन या तरुणाची आई सुनिताने २ जानेवारी रोजी आझाद नगर पोलिस ठाण्यात संपत्तीच्या वादाबाबतची तक्रार दाखल केली होती. सुनीताच्या राहत्या घरावरून अजयवीर, ईश्वर प्रेम, राजेंद्र सिहाग, प्रेम कांती, झाझरिया आणि अर्जून यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यामुळे पवन नैराश्यात असल्याने त्याने १ जानेवारी रोजी आत्महत्या केली.
या तक्रारीत सुनीता यांनी माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा, अजयवीर, ईश्वर प्रेम, राजेंद्र सहीत आणखी एका व्यक्तीवर तिच्या मुलाला त्रास दिल्याचा आरोप लावला. दाखल केलेल्या तक्रारीनुसार अजयवीर आणि इतर लोक गेल्या काही वर्षांपासून पवनला त्रास देत होते. तसेच मागच्याच आठवड्यात त्यांनी माय-लेकाला घर सोडण्यास सांगितले होते. ज्यामुळे पवनने टोकाचे पाऊल उचलले. जोगिंदर शर्मा हे हिसारचे पोलिस उप अधिक्षक असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी लावून धरली.
जोगिंदर शर्मा यांनी आरोप फेटाळले
जोगिंदर शर्मा हे रोहतक येथील रहिवासी आहेत. २००४ साली त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००७ साली झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या टीममध्ये त्यांचा समावेश झाला होता. २०२३ साली शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली. सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. पवनला मी कधीही भेटलो नाही किंवा त्याच्याबद्दल ऐकलेले नाही.