आसाममधील २००८ मधील बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयच्या जलदगती न्यायालयाने नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रण्ट ऑफ बोडोलॅण्डचा (एनडीएफबी) प्रमुख रंजन दाईमरी याच्यासह अन्य ९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

एनडीएफबीने ३० ऑक्टोबर २००८ रोजी गुवाहाटी, कोकराजहर, बोंगईगाव आणि बारपेटा येथे बॉम्बस्फोट मालिका घडविली होती. त्यामध्ये ८८ जण ठार झाले होते तर ४०० हून अधिक जखमी झाले होते. सीबीआयने आसाम पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता आणि २२ आरोपींची नावे असलेली दोन आरोपपत्रे दाखल केली. या प्रकरणातील सात आरोपी अद्याप फरार आहेत. पहिले आरोपपत्र २००९ मध्ये दाखल करण्यात आले तर दुसरे आणि अंतिम आरोपपत्र २० डिसेंबर २०१० रोजी सादर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी २०११ मध्ये सुरू झाली आणि २०१७ मध्ये हे प्रकरण जलदगती न्यायालयात आले. सुनावणीदरम्यान ६५० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

दाईमरी याला २०१० मध्ये बांगलादेशात अटक करण्यात आली आणि गुवाहाटी मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. मंगळवारी सीबीआय न्यायालयाने रंजन दाईमरी याच्यासह अन्य १४ जणांना दोषी ठरवले. बुधवारी न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली. दाईमरी आणि अन्य ९ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Story img Loader