पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका अनेक टप्प्यांत घेण्यात येतील आणि त्या नियोजित वेळेत पूर्ण होऊन १ जूनपूर्वी नव्या लोकसभेची स्थापना केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी येथे स्पष्ट केले.
लोकसभेच्या निवडणुका देशात पाच ते सात टप्प्यांत होतील आणि निवडणूक आयोगाने त्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे असे संपत यांनी ब्रूकिंग इन्स्टिटय़ूट येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. अमेरिका भारत बिझनेस कौन्सिल आणि सीआयआयच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
निवडणुकीच्या वेळापत्रकाचा सविस्तर तपशील संपत यांनी जाहीर केला नाही. तथापि, मार्च महिन्याच्या उत्तरार्धात निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, असे संकेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले. भारतातील निवडणुका नेहमीच वेळेवर झाल्या आहेत आणि त्यासाठी तयारी सुरू आहे, असेही ते म्हणाले.
विद्यमान लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याने १ जून रोजी नवी लोकसभा अस्तित्वात येईल. मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. मात्र या निवडणुका किती टप्प्यांत घ्यावयाच्या ते अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
प्रत्यक्ष मतदानाच्या पहिल्या दिवसापूर्वी सहा आठवडे अगोदर निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करील आणि घोषणा होईल त्याच दिवसापासून आचारसंहिता जारी होईल, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीचा कार्यक्रम आणि वेळापत्रक यांची आखणी करण्यापूर्वी राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, संबंधित विभागांशी सल्लासमलत केली जाईल. हवामान खाते, परीक्षांचे वेळापत्रक, सुटीचे दिवस आणि सण, त्याचप्रमाणे अन्य संबंधित विभागांशी समन्वय ठेवला जाईल, असेही संपत म्हणाले.
पारदर्शकता, नि:पक्षपातीपणा यावर पुढील निवडणुकीत प्रामुख्याने भर देण्यात येणार असून निवडणूक अधिकारी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन संबंधितांशी सल्लामसलत करणार आहेत. ‘पेड न्यूज’चा समावेश उमेदवाराच्या निवडणूक खर्चात केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास उमेदवाराला अपात्र घोषित केले जाईल. सध्या ‘पेड न्यूज’ हा दंडनीय गुन्हा नाही, असेही ते म्हणाले.
पुढील निवडणुकीत ७८० दशलक्ष मतदार मतदानाचा हक्क बजाविण्याची शक्यता असून त्यासाठी आठ लाखांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १.१८ दशलक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचाही वापर करण्यात येणार आहे

“भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखणार आहोत. मात्र काँग्रेसलाही पाठिंबा देणार नाही. आगामी निवडणुकीनंतर बिगरकाँग्रेस, बिगरभाजप सरकार सत्तेवर येईल. संघाच्या मदतीने भाजप सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी माकप आपली ताकद पणाला लावणार आहे.”
प्रकाश करात, सरचिटणीस, माकप

Story img Loader