पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा आक्रमक बाणा दिसून आला. त्यांनी भाजपावर टीकेचे बाण सोडले. देशात पुढील निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. “मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. ते तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे. राजकारणात समीकरणं बदलत असतात. आता विरोधकांना एकत्र येणं गरजेचं आहे. २०२४ च्या निवडणुकीत आम्हाला आशा आहेत. पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल”, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. १० जनपथ मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पहिला दिल्ली दौरा आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत पेगॅसस आणि करोनास्थितीवर चर्चा झाली, असं ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर सांगितलं. पेगॅससची चर्चा संसदेत नाही तर चाय पर होणार का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
It is essential for everyone to come together in order to defeat BJP…Alone, I am nothing – everyone will have to work together. I am not a leader, I am a cadre. I am a person from the street: West Bengal CM & TMC leader Mamata Banerjee when asked if she will lead the Opposition pic.twitter.com/3AylKRJd75
— ANI (@ANI) July 28, 2021
ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यातून भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न आहे, असंही बोललं जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा आणि घोषणेकडे एका नजरेतून बघितलं जात आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर सौजन्य भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.