दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने २७ वर्षांनी मोठा विजय प्राप्त केला. आम आदमी पक्षाकडून सत्ता खेचून आणल्यानंतर भाजपाने विविध राज्यात आनंदोत्सव साजरा केला. पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनीही दिल्लीतील विजयाचा आनंद व्यक्त करत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. दिल्लीच्या निकालानंतर माध्यमांशी बोलत असताना अधिकारी म्हणाले, “दिल्ली की जीत हमारी, २०२६ मै बंगाल की बारी” दिल्ली जिंकल्यानंतर आता बंगालमध्येही विजय मिळवू, असे अधिकारी यांना सुचवायचे होते.
बंगालमधील भाजपाचे आणखी एक नेते सुकांता मजुमदार म्हणाले, पुढील निवडणुकीत बंगालमधील जनताही दिल्लीप्रमाणेच मतदान करेल. अधिकारी आणि मजुमदार या दोन्ही नेत्यांनी दिल्लीमधील विजयासाठी हातभार लावणाऱ्या बंगाली मतदारांचे आभार मानले. ममता बॅनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता.
२०२० साली झालेल्या निवडणुकीत भाजपाला केवळ ८ जागा जिंकता आल्या होत्या. तर त्याआधी २०१५ साली त्यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी भाजपाने जोरदार मुसंडी मारत ४८ जागा जिंकल्या आहेत. तर तीन वेळा सत्ता भोगणाऱ्या आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
भाजपाचे बंगालवर लक्ष
पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्लीप्रमाणेच इथेही भाजपाला यश मिळालेले नाही. गेल्या दशकभरापासून इथे ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे. भाजपाच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेला इशारा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार करूनही २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आले. तर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. तसेच २०२१ च्या कोलकाता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही तृणमूलने भाजपाचा जोरदार पराभव केला.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष उडाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतर दोन्ही पक्ष एकमेकांना भिडलेले असून त्यातून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत. ज्यामध्ये अनेकांचा बळीही गेला आहे. गेल्या वर्षात संदेशखाली लैंगिक अत्याचार प्रकरण, आर.जी. कार रुग्णालयातील डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणात भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली दिसली.
इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पाठिंबा मिळावा, यासाठी ममता बॅनर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा त्यांना २०२६ ची विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या २०२९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र दिल्लीतील केरीवालांच्या पराभवामुळे आता राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.