बेल्जियममध्ये सावधगिरी
पॅरिस हल्ल्यानंतर आज २१ जणांना बेल्जियन अभियोक्तयांनी ताब्यात घेतले असून २२ ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. आज टाकलेल्या छाप्यात लीज व ब्रुसेल्स येथे पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान मुख्य आरोपी असलेला सलाह अब्देसलाम हा सापडलेला नाही. छापे टाकूनही अजून बेल्जियममध्ये सावधतेचा इशारा कायम असून लागोपाठ तिसऱ्या दिवशी तेथे व्यवहार बंद होते.
संघराज्य अभियोक्ते एरिक व्हॅन डेर सॅप्ट यांनी सांगितले, की मोलेनबीक तसेच ब्रुसेल्सच्या काही भागात छापे टाकण्यात आले. इतर शहरातही छापे टाकून कारवाई करण्यात आली. त्यात कुठलीही स्फोटके सापडलेली नाहीत, दरम्यान या प्रकरणी तपास चालूच राहणार आहे. ताब्यात घेतलेला एक जण मोटार धडकवताना जखमी झाला होता. शेकडो सुरक्षा जवान व अधिकारी रस्त्यावर गस्त घालीत होते. बेल्जियममध्ये पॅरिससारखा हल्ला होण्याच्या भीतीने लागोपाठ तिसऱ्या दिवशी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान चार्लस मिशेल यांनी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली असून उपमार्ग बंद करण्यात आले आहेत. पॅरिसप्रमाणे ब्रुसेल्समध्येही गर्दीच्या ठिकाणी हल्ला होण्याची भीती आहे. बेल्जियमच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाची याबाबत बैठक झाली असून ब्रुसेल्समध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, देशात इतरत्र तिसऱ्या पातळीचा धोक्याचा इशारा दिला आहे. या परिस्थितीत कुणालाही आनंद वाटणार नाही पण जबाबदारी म्हणून असे करणे आवश्यक आहे.
दरम्यान पाश्चिमात्य देशांनी आयसिसविरोधी कारवाई तीव्र करण्याची भूमिका घेतली असून पॅरिसमध्ये १३०, बैरूतमध्ये ४३ तर रशियन विमान पाडण्याच्या घटनेत २२४ जणांचा बळी आयसिसने घेतला आहे. आयसिसच्या कारवाया व निरपराध लोकांचा बळी घेणे खपवून घेतले जाणार नाही, असे क्वालालंपूर येथे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले आहे.

Story img Loader