प्रशासनातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका २१ वर्षीय तरुणीने केला आहे. या दोन अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी IAS असून ते सध्या दिल्ली फायनान्शियल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहात आहेत. या तरुणीने केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले असले, तरी यासंदर्भात तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. सरकारी नोकरी देण्याचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. तसेच, एक पत्रकार आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्याविरोधात आपली ओळख जाहीर केल्याची तक्रारही या तरुणीने केली आहे.
नेमकं काय घडलं?
या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, हा सगळा प्रकार या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात अंदमान – निकोबारमध्ये घडला. अंदमान-निकोबारचे तत्कालीन मुख्य सचिव जितेंद्र नरेन यांनी तिथले कामगार आयुक्त आर. एल. ऋषी यांच्यासमवेत मिळून नोकरीचं आमिष दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे. या तक्रारीच्या आधारावर १ ऑक्टोबर रोजी पोर्ट ब्लेअर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. वरीष्ठ पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
तरुणीने सांगितला घटनाक्रम
पीडित तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये नेमकं तेव्हा काय घडलं होतं, याचा घटनाक्रम सांगितला आहे. यानुसार, एप्रिल महिन्यात ही तरुणी नोकरीच्या शोधात असताना तिची भेट तत्कालीन कामगार आयुक्त ऋषी यांच्याशी झाली. त्यांनी नोकरीच्या संदर्भात तिची भेट नरेन यांच्याशी घालून दिली. ऋषी या तरुणीला नरेन यांच्या निवासस्थानी घेऊन गेले. तिथे तिला मद्य पिण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र, त्याला तरुणीने नकार दिला. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली आणि तिच्यावर दोघांनी बलात्कार केला, असा दावा तरुणीने तक्रारीत केला आहे.
पाकिस्तानमध्ये रुग्णालयाच्या छतावर सापडले २०० अज्ञात मृतदेह, गिधाडांसाठी ते ठेवल्याच्या अफवेने खळबळ!
दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा या दोघांनी तरुणीला नरेन यांच्या निवासस्थानी रात्री ९ च्या सुमारास बोलावलं. तिथे पुन्हा एकदा तिच्यावर बलात्कार करण्यता आल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. सरकारी नोकरीऐवजी झाला प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी या दोघांनी दिल्याचा दावाही पीडित तरुणीने केला आहे.
जितेंद्र नरेन यांची बाजू काय?
दरम्यान, यासंदर्भात जितेंद्र नरेन यांनी आपली बाजू मांडली आहे. या तरुणीने केलेले सर्व आरोप निराधार असून ते फेटाळत असल्याचं ते म्हणाले आहेत. “हे आरोप विचित्र आहेत. अशा आरोपांवर मी प्रतिक्रिया देणार नाही”, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात नरेन यांनी पंतप्रधान कार्यालयाला सविस्तर स्पष्टीकरण दिलं असून त्यामध्ये एका स्थानिक अधिकाऱ्याविरोधात आपण कारवाई केल्यामुळे त्याचा सूड घेण्यासाठी आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार असल्याचा दावाही नरेन यांनी केल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, ऋषी यांची मात्र प्रतिक्रिया या प्रकरणावर मिळू शकली नाही. इंडियन एक्स्प्रेसनं त्यांच्या प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पीडित तरुणीने ज्या गाडीत तिला नरेन यांच्या निवासस्थानी नेल्याचा उल्लेख केला, ती गाडी ऋषी यांच्याच नावावर नोंद असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात निवासस्थान आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जावी, अशी मागणी पीडित तरुणीनं केली आहे.