दक्षिण दिल्लीतील तिगरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका २१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तीन हजार रुपयांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

युसूफ अली असं हत्या झालेल्या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर शाहरुख असं आरोपीचं नाव आहे. बुधवारी आरोपी शाहरुखने एका दुकानाच्या बाहेर युसूफवर चाकूने हल्ला केला. आरोपीनं पीडित तरुणावर अनेक वार केले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी आरोपीला पकडलं आणि जखमी तरुणाची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. यानंतर जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

युसूफचे वडील साहीद अली यांनी पोलिसांना सांगितलं की, तीन ते चार दिवसांपूर्वी आरोपी शाहरुखने आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्या मुलाला धमकी दिली होती. युसूफने काही दिवसांपूर्वी शाहरुखकडून तीन हजार रुपये उसने घेतले होते. याच पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून युसूफची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader