हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी गेलेल्या शेकडो गिर्यारोहकांपैकी २२ गिर्यारोहक भूकंपामुळे हिमकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत ठार झाले असून २१७ अद्याप बेपत्ता आहेत.
भूकंपामुळे एव्हरेस्टच्या उत्तुंग शिखरावरून बर्फाचे मोठे कडे कोसळून २२ जण मरण पावले. माऊंट एव्हरेस्टच्या ‘बेस कॅम्प’ जवळ अनेक विदेशी लोकांसह शेकडो गिर्यारोहक अडकून पडले आहेत. प्रचंड आकाराच्या बर्फकडय़ांखाली गिर्यारोहण शिबिराचा काही भाग काल गाडला गेल्यामुळे ६० हून अधिक गिर्यारोहक जखमी झालेत, तर अनेक विदेशी गिर्यारोहक, पदभ्रमण करणारे आणि वाटाडे बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. १७ लोक बेस कॅम्पवर मरण पावले, तर त्याखालील भागात रविवारी आणखी ५ मृतदेह सापडल्याचे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे संकट ओढवले त्या वेळी बेस कॅम्पवर असलेल्या गेलू शेर्पा याने सांगितले की, तंबू उडून गेले आहेत. पर्वतावर फार गोंधळ असून मृतांची संख्या वाढणार आहे. या भागातून ३२ लोकांची सुटका करण्यात आली असून त्यांना ५ हेलिकॉप्टर्समधून हलवण्यात आले असल्याचे पर्यटन मंत्रालयाचे सहसचिव सुरेश आचार्य म्हणाले. भूकंपाच्या वेळी बेस कॅम्पच्या वरच्या भागात, माऊंट एव्हरेस्टवरील कॅम्प १ व कॅम्प २ जवळ १०० हून अधिक गिर्यारोहक होते. ते सर्व सुरक्षित असल्याचे नेपाळ गिर्यारोहण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एव्हरेस्ट परिसरात पदभ्रमण करणारी भारतीय सैन्याच्या गिर्यारोहकांचा एक चमू सुरक्षित
असल्याचे  सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले.

नेपाळमध्ये काल दुपारी गेल्या ८० वर्षांतील सर्वात मोठा भूकंप झाल्यामुळे एव्हरेस्टवरून हिमकडे कोसळले, त्या वेळी ४०० विदेशी गिर्यारोहकांसह किमान १ हजार गिर्यारोहक बेस कॅम्पवर होते. या भूकंपाचे धक्के शेजारच्या भारत व चीन या देशांनाही बसले.
– पर्यटन मंत्रालयाचा अधिकारी

Story img Loader