चेन्नई विमानतळावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिला प्रवाशाच्या बॅगमध्ये चक्क २२ साप आणि एक सरडा सापडला आहे. शुक्रवारी ही महिला मलेशियावरून चेन्नईत दाखल झाली होती. दरम्यान, सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्यावर वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – इजिप्तमध्ये आठव्या शतकातील बुद्ध मूर्तीचा शोध, संशोधकांच्या चमूत महाराष्ट्रातील शैलेश भंडारे
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित महिला ही शुक्रवारी फ्लाइट नंबर AK13 ने क्वालालंपूरहून चेन्नई विमानतळावर दाखल झाली होती. यावेळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेची तपासणी केली असता तिच्या बॅगमध्ये एका प्लास्टीकच्या डब्यात विविध प्रजातींचे २२ साप आणि एक सरडा असल्याने आढळून आले.
दरम्यान, सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्यावर सीमाशुल्क कायदा, १९६२ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला साप घेऊन नेमकी कुठे जात होती. याबाबतचा तपास सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.