देशाता करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला. आता दुसरी लाट ओसरत असली तरी करोनाची तिसरी लाट येणार असल्याती शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करोनाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन पॅकेज मंजूर केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी झालेल्या मोठ्या फेरबदलानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) आपल्या नवीन मंत्रिमंडळाची व्हर्चुअल बैठक घेतली. यावेळी करोनासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देशाचे नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मोठी घोषणा केली आहे. करोनाला लढा देण्यासाठी २३ हजार १२३ कोटी रुपयांच्या आपत्कालीन पॅकेजला मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मांडवीया म्हणाले, “कोविड पॅकेजसाठी मंत्रिमंडळाने २३ हजार १२३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी १५ हजार कोटी केंद्र तर ८ हजार कोटी राज्यांना वाटप करण्यात येणार आहेत.

आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी या पॅकेजविषयी माहिती देताना सांगितले की, “७३६ जिल्ह्यात बालरोग विभाग स्थापित केला जाईल. २० हजार आयसीयू बेड तयार केले जातील. मुलांसाठी विशेष व्यवस्था असेल. या पॅकेजअंतर्गत औषधांचा बफर स्टॉकदेखील तयार केला जाईल.”

हेही वाचा- केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! जुलैमध्ये महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ; जाणून घ्या किती मिळणार थकबाकी

मंडाविया म्हणाले,  “आपल्याला एकत्रितपणे करोना विरुद्ध संघर्ष करावा लागेल. हा निधी ९ महिन्यांत वापरला जाईल. राज्यांना सर्वतोपरी मदत करणे आपले कर्तव्य आहे. ”

हेही वाचा- “आता लसींची कमतरता भासणार नाही?”, आरोग्यमंत्री बदलल्यानंतर राहुल गांधींचा सवाल

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मनसुख मांडवीय यांच्याकडे देशाच्या आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आधीचे मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यासोबतच नव्याने तयार करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाचा अतिरिक्त भार असणार आहे. त्यासोबतच इतरही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी नव्याने शपथ ग्रहण केलेल्या मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.