गणेश बेटनभाटला, ऋषभ दोशी, चैतन्य मेहरा, नील मेहता, साहिल लविंगिया.. ही नावं गेली कधी आपल्या कानावरून? अर्थातच नाही. सामान्य वाटणारी ही नावे आहेत मोठी. आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने उच्चपदावर पोहोचलेली ही नावे आहेत आणि ही सारी मंडळी आहेत तिशीच्या आतली! म्हणजे आजच्या भाषेत ‘यंगिस्ताना’तली..!
‘फोर्ब्स’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने यंदाच्या वर्षांसाठी जगभरातील ४५० युवाताऱ्यांची निवड केली असून त्यात २३ भारतीय तरुणांचा समावेश आहे. मासिकाचा ‘थर्टी अंडर थर्टीज’ हा या आठवडय़ाचा अंक वयाच्या तिशीच्या आत जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या तरुणांची ओळख करून देणारा आहे. त्यात तालरा कॅपिटल या वित्तीय गुंतवणूक संस्थेचा व्यवस्थापकीय संचालक गणेश बेटनभाटला (२८), डीडब्ल्यू इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट संस्थेचा ऋषभ दोशी (२९), ओसीएच-झिफ कॅपिटल मॅनेजमेंटा पोर्टफोलिओ मॅनेजर चैतन्य मेहरा (२९), ६०० दशलक्ष डॉलर एवढा प्रचंड पसारा असलेल्या ग्रीनओक्स कॅपिटलचा संस्थापक नील मेहता (२९), ऑनलाइन डिजिटल प्रॉडक्टसचा साहिल लविंगिया (२१), घानामध्ये तांदूळ उत्पादनात आघाडीवर असलेल्या गॅडको कंपनीचा सहसंस्थापक करण चोप्रा (२९) आदींचा समावेश आहे. अल्प उत्पन्नगटातील कुटुंबांमधील बुद्धिमंत बालकांचा शोध घेऊन त्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या ‘अवंती’ या आगळ्या शिक्षणकेंद्राचा संस्थापक कृष्णा रामकुमार (२८) यालाही फोर्ब्सने यादीत स्थान दिले आहे. स्वच्छ ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात काम करणारी अजयिता शहा ही तरुणी, पदार्थाचा ताजेपणा टिकवून ठेवणारा फ्रेशपेपर बनविणारी कविता शुक्ला (२९), अमेरिकेतील फुटबॉलपटू मेधा पारेख (२८), सुपरजायंट गेम्स या संस्थेचा संचालक आमिर राव (२९), विज्ञान क्षेत्रात चमक दाखवणारी दिव्या नाग (२२), मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर रघू चिवनकला (२९), सुरभी सरना (२८) आदींचाही या यादीत समावेश आहे.  
हेही मानकरी
* सॅम चौधरी (२७) : क्लास दोजो सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक.
*प्रणव यादव (२८) : ब्रेन मॅपिंगसंदर्भातील न्यूरो साइट या कंपनीचा मुख्याधिकारी.
*ईशा खरे (१८) : इंटेल इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनीअरिंग फेअरमधील सवरेत्कृष्ट वैज्ञानिक.
वयाची तिशी ओलांडण्याआधीच वित्त व्यवस्थापन, प्रसारमाध्यमे, क्रीडा, शिक्षण आदी क्षेत्रांत असामान्य कर्तृत्व बजावणारी ही तरुणाई म्हणजे नव्या जगाच्या शोधप्रक्रियेतील बुद्धिमंतांची मांदियाळी आहे.
फोर्ब्स मासिक

Story img Loader