अमेरिकेच्या अलाबामा प्रांताच्या आग्नेय भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने किमान २३ जण ठार, तर अनेक लोक जखमी झाले आहेत.
दुर्दैवाने, या चक्रीवादळात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी आमच्याकडे आहे, असे ली परगण्याचे शेरिफ जे जोन्स यांनी एका खासगी दूरचित्रवाहिनीला सांगितले. दोघेजण अतिदक्षता विभागात असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
या संकटातून बचावलेल्यांचा शोध घेण्यासाठी उष्णता शोषून घेणाऱ्या उपकरणांनी सज्ज असलेले ड्रोन येथे वरच्या भागात उडत होते, मात्र धोकादायक परिस्थितीमुळे रविवारी उशिरा हा शोध थांबावावा लागला. या नैसर्गिक संकटामुळे अविश्वसनीय असा विध्वंस झाला आहे, असे जोन्स यांनी सांगितले.
सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्याला सुरुवात होणार होती. एकच कुटुंब राहात असलेली घरे आणि फिरती घरे या चक्रीवादळात नष्ट झाली, तर काही घरांचे फक्त छत उरले, असे जोन्स म्हणाले. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमा असलेल्या काही लोकांसह अनेकांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचे त्यांनी पूर्वी सांगितले होते.