Crime News From Keral : केरळच्या तिरुअनंतपुरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका २३ वर्षीय आफन या तरुणाने त्याच्या आजी, भाऊ आणि प्रेयसीसह सहा जणांची हत्या केल्याचा पोलिसांसमोर दावा केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांच्या मृत्यूची नोंद केली असून आईची स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
सोमवारी सायंकाळी काही तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी या हत्याकांडाच्या घटना घडल्या. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्या कुटुंबियांवर मोठं कर्ज होतं, त्यामुळे त्याने त्याच्या कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. गल्फमध्ये त्यांचा व्यवसाय होता. हा व्यवसाय डबघाईला आल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. दरम्यान, त्याच्या माहितीवर संपूर्णपणे अवलंबून न राहता पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे. त्यांचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याचे कॉल डिटेल्स चेक केले जात आहेत. तसंच, त्याला ड्रग्सचं व्यसन आहे का हेही तपासलं जात आहे.
पाच जणांचा मृत्यू, आईची स्थिती नाजूक
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने आधी त्याच्या आजीची सलमा बीवी (८८) यांची पंगोडा येथील राहत्या घरात हत्या केली. त्यानंतर तो त्याचा काकाच्या अब्दुल लथिफ (५८) यांच्या एस. एन पुरम येथे घरी गेला. तिथे त्याने काका आणि काकीची हत्या केली. तिथून तो पिरुमाला येथील त्याच्या घरी आला. तिथे त्याने त्याच्या आईवर हल्ला केला. तर, भाऊ अफझान (१४) आणि प्रेयसी फरशाना (१९) यांची हत्या केली. या हत्या केल्यानंतर तो थेट वंजारामूडू पोलीस ठाण्यात रिक्षाने गेला आणि तिथे त्याने केलेल्या कृत्याची माहिती दिली. पण त्यानेही विष प्यायलं असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांच्या मृत्यूंची नोंद केली असून त्याची आई अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. तिला आधीच कर्करोगही झाला आहे.
दरम्यान आफन आणि अफझान हे दोघेही गल्फ येथे त्यांच्या वडिलांबरोबर एक व्यवसाय करतात. मात्र, व्यवसायात नुकसान झाल्याने ते केरळला परतले होते.