गुरुग्राम येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याने तरुणाने १९ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीच्या आईसमोरच तरुणाने चाकू हल्ला केला. आईने तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण, तिला अपयश आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकुमार ( २३ वर्षे ) असं आरोपीचं नाव आहे. तरुणाला तरुणीच्या कुटुंबीयांनी पालम विहार पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मृत्यू झालेली तरुणी आणि आरोपी राजकुमार उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील रहिवाशी आहेत. तरुणी घरकाम करत असे. खूनाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजकुमार आणि १९ वर्षीय तरुणीचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. पण, अलीकडेच हे लग्न मोडलं होतं. त्यातच राजकुमार तरुणीला भेटण्यासाठी आला होता. तेव्हा तरुणीची आईही बरोबर होती. यावेळी राजकुमार आणि तरुणीमध्ये वादावादी झाली. याच रागातून राजकुमारने तरुणीवर चाकूने हल्ला केला.

तरुणीच्या आईने राजकुमारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकुमारने न जुमानता तरुणीवर चाकूने सपासप वार केले. यानंतर तरुणीच्या आईने राजकुमारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी १९ वर्षांची असून ती दिल्लीतील मुल्ला हैदा येथील रहिवाशी आहे. आरोपी राजकुमार हा देखील त्याच परिसरात राहतो. गुन्ह्यासाठी वापरलेले चाकू, मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. राजकुमारने तरुणीवर दोनदा चाकूने हल्ला केला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणीचे शवविच्छेदन करण्यात आलं असून, पुढील तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 year old man stabbed 19 year old girl front her mother in gurugram ssa