फिलिपाइन्सला बुधवारी झंझावाती वादळाने दिलेल्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३८ झाली असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. पुरामुळे तसेच अनेक भागांत दलदल झाल्याने मदतकार्यात गंभीर अडथळेही येत आहेत.
ताशी २१० किलोमीटर वेगाने आलेले बोफा वादळ बुधवारी मिन्दानाव बेटावर प्रथम थडकले आणि एकच हाहाकार उडाला. या बेटावरील न्यू बाटान शहरातच १४२ जण मृत्युमुखी पडले तर २४१ जण बेपत्ता झाले. जवळच्याच दावाओ प्रांतात ८१ जण मृत्युमुखी पडले तर पानिझा आणि अन्य भागांत आणखी १५ जण दगावले. अनेक गावे आणि शहरांत अगदी तुरळक इमारतीच कशाबशा तग धरून असून बरीचशी घरे व इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. निवाऱ्याचे छप्परच हिरावले गेल्याने वादळवाऱ्यात व पावसात उघडय़ावर राहाण्याची पाळी हजारो लोकांवर आली आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी तंबू, कोरडे कपडे, औषधे, खाद्यपदार्थ घेऊन मदतपथके रवाना झाली आहेत. पण पूर आणि जागोजाग निर्माण झालेल्या दलदलमय प्रदेशामुळे वादळग्रस्तांपर्यंत पोहोचणे मोठे जिकिरीचे झाले आहे. मदतीसाठी सरसावलेले काही सैनिकच मृत्युमुखी पडले आहेत आणि बेपत्ता झाले आहेत.   

Story img Loader