नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बीबीसी वृत्तवाहिनीच्या वृत्तपटाच्या सामूहिक प्रदर्शनावरून दिल्लीतील विद्यापीठांमधील तणाव वाढू लागला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामियानंतर शुक्रवारी दिल्ली विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठात या वृत्तपटावरून गदारोळ माजला. पोलिसांनी आतापर्यंत दिल्ली विद्यापीठातील २४ विद्यार्थ्यांना , ताब्यात घेतले.
दिल्लीतील विद्यापीठांच्या प्रशासनांनी विद्यापीठाच्या आवारात वृत्तपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिलेली नाही. तरीही दिल्ली विद्यापीठामध्ये प्रदर्शनाचा आटापीटा विद्यार्थ्यांनी केला. प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवरून वृत्तपटाच्या लिंकचा क्यूआर कोड एकमेकांना पाठवल्यामुळे मोबाइलवर हा वृत्तपट विद्यार्थ्यांना पाहता आला. तरीही, विद्यापीठाच्या आवारात सामूहिक प्रदर्शनासाठी शुक्रवारी दुपारपासून मोठय़ा संख्येने विद्यार्थी जमले.
या वृत्तपटाच्या सामूहिक प्रदर्शनावरून ‘जेएनयू’ व जामिया या दोन्ही विद्यापाठांमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. दिल्ली विद्यापाठामध्ये अनुचित प्रकार व तणाव टाळण्यासाठी विद्यापीठाच्या आवारात तसेच, आसपासच्या परिसरात जमाव बंदी लागू करण्यात आली. पोलिसांच्या बंदोबस्तातही वाढ करण्यात आली. पण विद्यार्थ्यांनी वृत्तपट दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत २४ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
‘इंडिया-मोदी क्येशन’ या वृत्तपटावर केंद्र सरकारने बंदी घातली असून समाजमाध्यम कंपन्यांना या वृत्तपटाची लिंक काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. केरळमध्ये हा वृत्तपट सामूहिकरित्या दाखवला गेल्यानंतर दिल्लीतील विद्यापीठांमध्येही दाखवण्याचे प्रयत्न विद्यार्थ्यांनी सुरू केले. ‘जेएनयू’नंतर बुधवारी जामिया विद्यापीठामध्ये हा वृत्तपट दाखवण्याचा आग्रह धरला गेला. त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर १३ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. या निषेधार्थ शुक्रवारी जामियामध्ये एकही अभ्यासवर्ग झाला नाही.