विशाखापट्टणम येथील बंदरात काल (१९ नोव्हेंबर) रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत २५ मासेमारी नौकांची राख झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी भारतीय नौदलाचे एक जहाज आले असून आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक अग्निशमन गाड्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. प्रत्येक बोटीची किंमत सुमारे १५ लाख आहे. या घटनेत अंदाजे ४ ते ५ कोटींचं नुकसान झाले आहे.
विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त रविशंकर यांनी सांगितले की, रात्री उशिरा एका मासेमारीच्या बोटीला आग लागली. ही आग पसरू नये यासाठी बोट कापून टाकण्यात आली. पण वारा आणि पाण्याच्या प्रवाहाने ती पुन्हा जेटीवर आली. परिणामी इतर बोटीही जळू लागल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बोटीत डिझेल कंटेनर आणि गॅस सिलिंडर होते. त्यामुळे आग अधिक पसरत गेली आणि संपूर्ण जेट्टीत आगीचा भडका उडाला.
एका बोटीत पार्टी सुरू होती, त्यामुळे आग लागली असावी असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर काहींच्या मते गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी बोटींना आग लावली असल्याचा संशय मच्छिमारांनी व्यक्त केलाय.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आनंदा रेड्डी यांनी सांगितले की, आग रात्री साडेअकराच्या सुमारास लागली. बोटीवरील सिलिंडरमुळे स्फोट झाले, त्यामुळे आम्ही लोकांना दूर राहण्यास सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल काम करत आहेत. आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे”, असेही ते म्हणाले.
पोलिस आयुक्त रविशंकर यांनी या घटनेच्या तळापर्यंत जाण्यासाठी सर्वतोपरी चौकशी केली जाईल असे सांगितले.