जमात-ए-इस्लामीचा नेता अब्दुल कादर मोल्ला याला गुरुवारी रात्री फाशी देण्यात आल्यानंतर बांगलादेशात उसळेलला हिंसाचार अजून सुरूच आहे. रविवारी झालेल्या धुमश्चक्रीत आणखी चार जण ठार झाल्याने मृतांची संख्या आता २५ झाली आहे. पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी मात्र दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
उत्तर लालमोनिरहाट जिल्ह्य़ात तीन इस्लामी कार्यकर्ते चकमकीत ठार झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी जमातच्या कार्यकर्त्यांनी एका अवामी लीग समर्थकाची सकाळी हत्या केली. अल्पसंख्याक हिंदूू समाजाचे दहा जण जमातच्या कार्यकर्त्यांनी काफिरपझार येथे केलेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. मिरपूरचा खाटिक म्हणून कुप्रसिद्ध असलेला मोल्ला याला १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धाच्या वेळी केलेल्या गुन्ह्य़ांना जबाबदार ठरवून फाशी देण्यात आले त्यानंतर बांगला देशात हिंसाचार सुरू झाला.
मोल्ला याला फाशी देण्यापूर्वी त्याची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. जमात-ए-इस्लामीने मोल्ला याला दिलेली फाशी हा राजकीय खून असल्याचे म्हटले आहे. काल बेचाळिसाव्या हुतात्मा दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या विरोधक व बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या प्रमुख बेगम खलिदा झिया यांच्यावर मानवतेविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना जमातने पाठीशी घातल्याचा आरोप केला. ‘आम्ही खूप सहिष्णुता दाखवली आता यापुढे दाखवणार नाही, अशा अत्याचारांना कसे उत्तर द्यायचे हे जनतेला व सरकारला माहीत आहे’ असेही त्या म्हणाल्या. दरम्यान जमात-ए-इस्लामीने मोल्लाच्या फाशीविरोधात रविवारी बंदची हाक दिली होती. त्यामुळे उत्तर रंगपूर जिल्ह्य़ात जमातच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे मार्ग उखडले.
जमातचा नेता मोल्ला याच्या फाशीनंतर बांगलादेशात हिंसाचार ; २५ बळी
जमात-ए-इस्लामीचा नेता अब्दुल कादर मोल्ला याला गुरुवारी रात्री फाशी देण्यात आल्यानंतर बांगलादेशात उसळेलला हिंसाचार अजून सुरूच आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-12-2013 at 01:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 killed in bangladesh as mollahs execution sparks violent protests