दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २५ गंभीर रुग्णांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
धक्कादायक: विरारमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ करोना रुग्णांचा मृत्यू
अनेक राज्यांप्रमाणे दिल्लीतही अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. गंगाराम रुग्णालय हे दिल्लीमधील खासगी रुग्णालयांमध असून ६७५ बेड्सचं एक नामांकित रुग्णालय आहे. मात्र तिथेही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून २५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “गेल्या २४ तासांत २५ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फक्त दोन तास पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. व्हेटिंलेटरदेखील नीट काम करत नाही आहेत. आयसीयू आणि एमजर्नसीमध्ये सध्या मॅन्यूअल व्हेटिंलेशन सुरु आहे. मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. ६० रुग्णांचा जीव सध्या सध्या धोक्यात असून तात्काळ मदतीची गरज आहे”. रुग्णालयाने तात्काळ ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.