चंदीगढमध्ये हिट अँड रनची बातमी समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या एका मुलीला भरधाव वेगात आलेल्या थारने चिरडलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. चंदीगढमधल्या फर्निचर मार्केटच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
नेमकी काय घडली घटना?
समोर आलेल्या माहितीनुसार ज्या मुलीला चिरडलं गेलं आणि जी मुलगी गंभीर जखमी झाली त्या मुलीचं नाव तेजस्विता कौशल असं आहे. शनिवारी रात्री ११. ४० ला तेजस्विता चिरडलं आणि थार पुढे निघून गेली. ही थार गाडी चुकीच्या मार्गाने येत होती असंही सांगितलं जातं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
जखमी तेजस्वितावर रूग्णालयात उपचार सुरू
जखमी झालेल्या तेजस्वितावर जीएमएसएच १६ मध्ये उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला टाके घालण्यात आले आहेत. सध्या ती बोलते आहे तिची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मात्र बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांविरोधा कारवाई करण्याची मागणी या मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
रोज भटक्या कुत्र्यांना खायला घालत होती मुलगी
सेक्टर ६१ च्या पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेजस्विताला धडक देणाऱ्या थारचा ड्रायव्हर फरार झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. तेजस्विताचे वडील ओजस्वी कौशल यांनी सांगितलं की माझी मुलगी आर्किटेक्ट ग्रॅज्युएट झाली आहे. सध्या ती UPSC ची तयारी करते आहे. रोज रात्री आपल्या आईसोबत ती फर्निचर मार्केट या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालते. शनिवारी रात्री तेजस्वितासोबत तिची आईही गेली होती असंही तिच्या वडिलांनी सांगितलं.
दोन दिवसांपूर्वीच राजधानी दिल्लीतलं एक प्रकरण समोर आलं होतं यामध्ये कारचालकाने एका युवकाला धडक दिली. यानंतर या तरूणाला अर्धा किमी फरपटत नेलं. या दोघांमध्ये हॉर्न वाजवण्यावरून वाद झाला होता.