औषधं आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित आसिफ खान याच्या चुलत भावांनाही यावेळी जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. गुडगावमधील मेवाट येथे ही घटना घडली आहे. आसिफ खानच्या कुटुंबाने हा झुंडबळीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत.
जीम ट्रेनर असणारा आसीफ खान आपल्या चुलत भावांसोबत घऱी परतत होता. यावेळी जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात आसिफ खानचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव आहे. स्थानिकांनी रस्ता अडवत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या प्रमाणात दगडफेकदेखील करण्यात आली.
आसिफ खानच्या कुटुंबाने हा झुंडबळीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. आसिफला जमावाने काठ्या, रॉड आणि दगडांनी मारहाण करत हत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. हत्या केल्यानंतर आसिफचा मृतदेह सोहना गावात फेकून देण्यात आला होता.
मृतदेह पाहिल्यानंतर गावकऱ्यांचा संताप झाला. यानंतर त्यांनी गुडगाव-अलवर रोड अडवत आंदोलन केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. नंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान हत्येमध्ये १२ लोक सहभागी होते असा कुटुंबाचा आरोप आहे.