Tahawwur Rana Extradiction: पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यातील आरोपी आणि पाकिस्तानमधील व्यावसायिक तहव्वूर हुसैन राणा याला भारताच्या ताब्यात देण्याबाबत अमेरिकी न्यायालयाने अनुकूल असा निकाल दिला आहे. तहव्वूर राणाचे आता अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ न्यायालयाने प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते, असे सांगितले आहे.
तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेविड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा आरोप राणावर आहे.
भारतावरील हल्ला योग्यच, राणाची कबुली
तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन करता येऊ शकते, भारताने त्यासाठी योग्य ते पुरावे दिले आहेत, न्यायाधीश मिलान स्मिथ यांनी सांगितले. “मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला योग्यच होता”, अशी कबुलीही राणाने दिल्याचे सुनावणी दरम्यान न्या. स्मिथ यांनी सांगितले.
राणाचा जन्म आणि शिक्षण पाकिस्तानात झाले. त्याने थोड्या काळासाठी पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा दिल्यानंतर, १९९७ मध्ये तो कॅनडाला गेला. तो इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत झाला आणि अखेरीस त्याने कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. २००९ साली डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे एक चित्र छापल्यानंतर वृत्तपत्राचे कार्यलय बॉम्बने उडवून देण्याची योजना राणाने आखली होती. याप्रकरणात शिकागोच्या न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते.
शिकागोच्या न्यायालयाने त्याच्यावर तीन गुन्हे दाखल केले होते, तसेच मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याचाही आरोप केला होता. करोना काळात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर राणाला तुरूंगातून सोडले गेले होते. तेव्हापासून त्याच्या अटकेची मागणी भारताकडून केली जात होती.
६/११ च्या हल्ल्याशी राणाचा संबंध
अटकेनंतर तहव्वूर राणाने कबूल केले की, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ही एक दहशतवादी संघटना आहे आणि त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली पाकिस्तानमधील त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात गेला होता. अमेरिकन कागदपत्रानुसार, २००५ च्या उत्तरार्धात हेडलीला एलईटीकडून भारतात प्रवास करून तिथे पाळत ठेवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. २००६ च्या सुरुवातीस, हेडलीने एलईटीच्या दोन सदस्यांसह मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्याबाबत चर्चा केली. हेडलीने राणाला याची माहिती दिली आणि त्यांनी राणाच्या फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे कार्यालय वापरण्याचा निर्णय घेतला, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.