२६/११च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात स्वतःची बाजू मांडण्यासाठी पाकिस्तानमधील सरकारने मदत करावी, यासाठी लष्करे तैय्यबाचा म्होरक्या हाफिज मोहम्मद सईद याने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पाकिस्तानातील न्यायालयाने चार महिन्यांसाठी स्थगित केली.
मुंबई हल्ल्याप्रकरणी आयएसआयचे माजी प्रमुख अहमद शुजा पाशा आणि अन्य अधिकाऱयांवर समन्स बजावण्याच्या अमेरिकेतील न्यायालयाच्या निर्णयाला अमेरिकेतील कायदा विभागाने आव्हान दिले आहे. हा विषय अमेरिकी न्यायालयाच्या कक्षेबाहेर असल्याचे कायदा विभागाने म्हटले आहे. या प्रकरणी अमेरिकी न्यायालय काय निर्णय देते, ते पाहून मगच पाकिस्तानातील न्यायालयाने सईद याच्या याचिकेवर सुनावणी घ्यावी, असे मत पाकिस्तानातील उपमहाधिवक्त्यांनी लाहोर उच्च न्यायालयाचे न्या. उमर बांदियाल यांच्यापुढे मांडले होते. त्यानंतर न्यायालयाने सईदच्या याचिकेवरील सुनावणी चार महिन्यांसाठी स्थगित केली. याप्रकरणी आता २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबई हल्ल्यात जे ज्यू नागरिक मारले गेले, त्यापैकी दोघांच्या नातेवाईकांनी अमेरिकेतील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवरून न्यायालयाने सईद याला समन्स बजावले असून, त्याला प्रतिवादी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा