मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लखवी याच्यासह सात जणांवर रावळपिंडी येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आता इस्लामाबादमधील दहशतवादविरोधी न्यायालयात घेण्यात येणार आहे.
रावळपिंडीतील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती चौधरी हबीब-ऊर-रेहमान यांनी याबाबत सरकारच्या वतीने करण्यात आलेला विनंती अर्ज मंजूर केला आणि या खटल्याची सुनावणी इस्लामाबादमधील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती कौसर अब्बास झैदी यांच्यापुढे घेण्याची परवानगी दिली.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्यान्वये सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी घेण्यासाठी अलीकडेच झैदी यांच्या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत इस्लामाबादमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयाची स्थापना करण्यात आली नव्हती. त्यामुळे दहशतवादाशी संबंधित सर्व खटल्यांची सुनावणी रावळपिंडी येथे घेण्यात येत होती.
आता इस्लामाबादमध्ये या खटल्याची सुनावणी नव्याने घेण्यात येणार असून, न्यायमूर्तीना खटल्याचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी काही कालावधी लागेल, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
न्यायमूर्ती रेहमान यांनी शनिवारी अन्य कोणत्याही खटल्याची सुनावणी घेतली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा