मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली याचा साथीदार व पाकिस्तानी वंशाचा कॅनॅडियन नागरिक असलेल्या तहव्वूर राणा याला अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाने गुरुवारी १४ वर्षांची शिक्षा सुनावली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबाला मदत करणे आणि डेन्मार्कमधील वृत्तपत्रावरील हल्ल्याच्या कटातील सहभाग या आरोपांवरून राणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२६/११प्रकरणी २००९मध्ये अटक करण्यात आलेल्या राणाची मुंबई हल्ला प्रकरणातील आरोपांतून आधीच सुटका झाली आहे. मात्र, डेन्मार्कमधील मोर्गेनाविसेन जीलँड्स-पोस्टेन या वृत्तपत्राच्या कर्मचऱ्यांची हत्या करण्यासाठी आखण्यात आलेल्या कटाप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. तसेच २००५ ते ऑक्टोबर २००९ या कालावधीत लष्कर ए तय्यबाला मदत केल्याप्रकरणीही तो दोषी आढळला आहे. या खटल्याच्या शिक्षेची निश्चिती करण्यासाठी गुरुवारी अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात सुमारे दीड तास चाललेल्या सुनावणीदरम्यान राणाच्या वकिलांनी त्याच्या खराब प्रकृतीचे कारण पुढे करत त्याची शिक्षा कमी करण्याची मागणी केली. मात्र, राणाने आखलेला कट अत्यंत क्रूर होता, असा निर्वाळा देत न्या. हॅरी डी लिनेनवेबर यांनी ही मागणी फेटाळून लावली. राणाला १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावतानाच तेथून सुटल्यानंतर पाच वर्षे त्याला पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ‘दहशतवादी कारवाया करण्यात गुंतलेले लोक स्वत:च्या जीवाबद्दल पर्वा करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा सुनावून अशा कारवायांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे,’ असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा