कर्जबुडवे तसेच आर्थिक गैरव्यवहार करणारे २७ व्यावसायिक गेल्या पाच वर्षांत भारताबाहेर गेले असल्याची माहिती शुक्रवारी संसदेत सरकारच्या वतीने देण्यात आली.
लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी सांगितले की, देशाबाहेर गेलेल्या २७ कर्जबुडव्या व्यावसायिकांपैकी २० उद्योजकांविरुद्ध इंटरपोलने नोटिस बजाविली आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने २७ पैकी ७ उद्योजकांविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचेही सांगण्यात आले.ब्रिटनद्वारे भारतात हस्तांतरित करावयाच्या किंगफिशर एअरलाईन्सचे विजय मल्या यांच्या प्रक्रियेबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. हिरे व्यापारी नीरव मोदीबद्दल मात्र काहीही सांगण्यात आले नाही.
सरकारी बँकांना 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या कंपनीच्या संचालकांच्या पासपोर्टची एक प्रत जमा करुन घेण्याचे निर्देशही दिल्याचे सरकारच्या वतीन संसेदत सांगण्यात आले.
दरम्यान, भारतातील अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून ब्रिटनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात मुंबईतील न्यायालय आज (शनिवारी) निकाल देण्याची शक्यता आहे. न्यायालयाने मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.