Munich Car drives into crowd : जर्मनीच्या दक्षिणेला असणार्‍या म्युनिक शहरात गुरूवारी एकाने कार गर्दीत घुसल्याने किमान २८ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १०:३० च्या सुमारास म्युनिक शहराजवळ ही घटना घडली. दरम्यान हा हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी कार चालकाची ओळख पटली असून तो राजाश्रयाच्या शोधात म्युनिकमध्ये आलेला २४ वर्षीय अफगाणी तरूण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये माहिती दिली की, एक कार लोकांच्या गर्दीत घुसल्यानंतर अनेक लोक जखमी झाले. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून सध्या कसलाही धोका नसल्याचेही यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.

म्यूनिक शहरात हाय-प्रोफाइल म्युनिक सुरक्षा परिषदेचे (Munich Security Conference) आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद होण्याच्या एक दिवस आधी हा हल्ला झाला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) हे परिषदेसाठी शहरात येणार आहेत. त्यापूर्वी झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मिनी कूपर कार आंदोलन करत असलेल्या वेर्दी यूनियनच्या कामगारांच्या गर्दीमध्ये घुसली. यानंतर तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेनंतर शहरातील सेंट्रल ट्रेन स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस कारवाई करत नेमकं काय झालं याचा शोध घेण्यात आला.

गेल्या वर्षीही झाला होता असाच हल्ला

गेल्या वर्षी जर्मनीमधील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये एका स्थलांतरित व्यक्तीने गर्दीत गाडी घुसवल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आणि २०० जण जखमी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28 injured afghan asylum seeker rams car into crowd in germany munich marathi news rak