टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी, त्यांची पत्नी टिना अंबानी यांच्यासह १७ साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी बोलावण्याची मागणी सरकारी पक्षाने केल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींना यासंदर्भात त्यांची बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्या न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींना ३ जुलैपर्यंत आपली बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. टू जी घोटाळ्यातील सत्य परिस्थिती उघड करण्यासाठी अनिल आणि टिना अंबानी यांच्यासह १७ साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची असल्याचे विशेष सरकारी वकील यू. यू. ललित यांनी न्यायालयात सांगितले. बॅंकांकडून झालेल्या आर्थिक व्यवहाराची काही कागदपत्रे सीबीआयला मिळाली आहेत. त्यादृष्टिने या साक्षीदारांची साक्ष सरकारी पक्षासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी उद्योगसमूहातील विविध कंपन्यांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्यासाठी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची साक्ष आवश्यक असल्याचे ललित यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

Story img Loader