टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स अनिल धीरभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी गुरुवारी दिल्लीतील न्यायालयात साक्ष नोंदविली. रिलायन्स कंपनीच्या संचालक मंडळांच्या वेगवेगळ्या बैठकांचे इतिवृत्त आपण लिहिले नसल्यामुळे त्या बैठकांबद्दल आपल्याला काही आठवत नाही, असे त्यांनी न्यायालयापुढे साक्ष देताना सांगितले. 
टू जी खटल्याप्रकरणी न्यायालयात साक्ष देण्यासाठी येण्यास अनिल अंबानी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टाळाटाळ करीत होते. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा न दिल्यामुळे अखेर ते गुरुवारी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर झाले.
एएए कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या प्रत्येक बैठकीतील चर्चा आणि निर्णयांबद्दल मला काही आठवत नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर विशेष सरकारी वकील यू. यू. ललित यांनी त्यांना या कंपनीने २००५-०६ मध्ये घेतलेल्या बैठकांचे इतिवृत्त दाखविले.
मी वेगवेगळ्या बैठकांना उपस्थित राहात असतो. कोणत्या बैठकीत काय झाले, हे मला आठवत नाही. मी केवळ रेकॉर्ड पाहून निर्णय घेतो, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर तुम्ही चुकीचे रेकॉर्ड तर ठेवणार नाही. तुमचे रेकॉर्ड नक्कीच बरोबर असेल, असा प्रश्न त्यांना न्या. ओ. पी. सैनी यांनी विचारला. रेकॉर्ड नक्कीच बरोबर असतील, असे उत्तर अनिल अंबानी यांनी न्यायाधीशांच्या प्रश्नावर दिले.