संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) काळातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टू जी घोटाळ्याचा निकाल गुरूवारी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा, डीएमके नेत्या आणि खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व १७ आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर टू जी घोटाळ्यामुळे टीकेचे मोठ्याप्रमाणावर धनी व्हावे लागलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे, असे मला वाटते. मला आनंद आहे की, यूपीए सरकारविरोधात मोठ्याप्रमाणावर जो अपप्रचार करण्यात आला होता, तो आजच्या निकालामुळे नि:संशयपणे निराधार सिद्ध झाला.
2G Spectrum Scam Verdict: टू जी घोटाळा: ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी दोषमुक्त
काँग्रेसप्रणित ‘यूपीए २’ च्या कार्यकाळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला होता. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, असा निष्कर्ष ‘कॅग’ च्या अहवालामध्ये काढण्यात आला होता. या घोटाळ्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला होता. स्पेक्ट्रम वाटपासंबंधीच्या ७ जानेवारी २००८ च्या प्रसिद्धी अधिसूचनेत ए. राजा यांनी फेरफार केल्याचा ठपका संयुक्त संसदीय समितीच्या अहवालात ठेवण्यात आला होता. २०११ मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु झाली. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित केले होते. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.
टू जी घोटाळ्यावर नरेंद्र मोदींनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे: काँग्रेस