टूजी स्पेक्ट्रम प्रकरणातील स्वान दूरसंचारचे प्रवर्तक शाहीद बलवा यांना मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द करावा, अशी मागणी सीबीआयने शुक्रवारी दिल्ली न्यायालयात केली. बलवा यांच्या वर्तणुकीमुळे त्यांच्या जामिनाबाबत फेरविचार करण्याची गरज असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
टूजी घोटाळाप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या वेळी बलवा यांनी जे स्पष्टीकरण दिले होते ते मागे घेण्याची अनुमती मागणारी याचिका बलवा यांनी सादर केली. त्यामुळे सीबीआयने वरील मागणी केली.
प्रश्नांबाबत स्पष्टीकरण देताना बलवा यांनी जी हरकतपूर्ण विधाने केली आहेत ती पाहता त्यांची वर्तणूक त्यांच्यावर दाखविण्यात आलेल्या विश्वासाला तडा देणारी आहे. त्यामुळे त्यांना मंजूर करण्यात आलेल्या जामिनाचा फेरविचार करणे गरजेचे आहे, असे सीबीआयने विशेष सीबीआय न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांच्या न्यायालयात सांगितले.
हरकतपूर्ण विधाने
न्यायालयाने या प्रश्नावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द करावा, वस्तुस्थितीकडे लक्ष देऊन बलवा यांच्या हरकतपूर्ण विधानांची दखल घेऊन न्यायालयाने योग्य कारवाई करावी, असे सीबीआयने म्हटले आहे. बलवा यांनी जे स्पष्टीकरण दिले त्याकडे पाहता असे दिसते की, हरकतपूर्ण विधाने जाणूनबुजून समाविष्ट करण्यात आली आहेत, असेही सीबीआयने म्हटले आहे.