आसामच्या बाक्सा जिल्ह्य़ात शुक्रवारी हिंसाचाराचा पुन्हा एकदा नव्याने उद्रेक झाला. एनडीएफबीच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
अवघ्या २४ तासांत हा दुसरा हल्ला करण्यात आला असून, आतापर्यंत ३० पेक्षाही अधिकजण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर बाक्सा जिल्ह्य़ात संचारबंदी जारी करण्यात आली असून, लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
एनडीएफबी दहशतवाद्यांनी कोक्राझार जिल्ह्य़ातील बालपारा-१ गावात पहाटे तीन घरांवर एके-४७ रायफलींनी हल्ला चढविला आणि बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये सात जण जागीच ठार झाले. त्यामध्ये दोन मुले आणि चार महिलांचा समावेश असून ते अल्पसंख्य समाजातील आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात तीन वर्षांचे एक बालकही ठार झाले असून त्याचा मृतदेह सकाळी मिळाला, असेही पोलिसांनी सांगितले.
या परिसरातील घरांवर दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ एक असा हल्ला चढविला. बाक्सा जिल्ह्य़ातील एनडीएफबी-एसच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.आनंद बाजार परिसरात घरात घुसून दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविला.
याच जिल्ह्य़ात बिपीन बोरो यांच्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घुसखोरीविरोधात हाती घेण्यात आलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले चढविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.