युनायटेड स्टेट्समधील लास वेगास (UNLV) येथील नेवाडा विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये बुधवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात संशयित आरोपीचाही मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
लास वेगास येथील स्थानिक रुग्णालयात तीन मृतांसह एका गंभीर जखमी झालेल्या तरुणाला दाखल करण्यात आलं आहे. गोळीबार करणारा व्यक्तीही मृतावस्थेत सापडला आहे. पोलिसांबरोबरच्या चकमकीत संशयिताचा मृत्यू झाला की त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही, अशी माहिती लास वेगास पोलिसांनी एका निवेदनाद्वारे दिली.
मृतांची अद्याप ओळख पटली नाही. गोळीबाराच्या या घटनेनंतर पोलिसांनी विद्यापीठ रिकामं केलं. बॅकपॅकसह अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी कॅम्पसमधून सुरक्षितपणे बाहेर काढलं, याबाबतचं वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलं आहे.
नेवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक व्हिन्सेंट पेरेझ यांनी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ कॅम्पसमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. किमान सात ते आठ वेळा गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज ऐकताच आम्ही पुन्हा आतमध्ये पळालो. त्यानंतर आम्हाला कळालं की खरोखर गोळीबार होत आहे आणि कॅम्पसमध्ये बंदुकधारी व्यक्ती फिरत आहे.