Al Qaeda Training Module Case: आरोपीच्या अटकेच्या तारखेपासून १८० दिवसांच्या आत जर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नाही तर आरोपी जामीन मिळण्यास पात्र आहेत, यावर पुन्हा एकदा भर देत, दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने नुकताच अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधीत “दहशतवादी मॉड्यूल”चा भाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तीन जणांना जामीन मंजूर केला. पटियाला हाऊस न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी रांची येथील उमर फारूख, हसन अन्सारी आणि अर्शद खान या तिघांना सोडण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी २२ ऑगस्ट रोजी राजस्थानच्या भिवाडी जिल्ह्यात दहशतवादी मॉड्यूलचे शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना अटक केली होती.
ऑगस्टमध्ये, दिल्ली पोलिसांच्या विशेष दहशतवादविरोधी पथकाने झारखंड दहशतवादविरोधी पथकाच्या सहकार्याने रांची येथील रेडिओलॉजिस्ट डॉ. इश्तियाक अहमद याच्या नेतृत्वाखालील एका दहशतवादी मॉड्यूल समोर आणले होते. विशेष पथकाने रांची येथून इश्तियाकसह ११ संशयितांना अटक केली होती.अटक झाल्यापासून ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. आता यातील भिवाडी येथून अटक केलेल्या तिघांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान डॉ. इश्तियाक अहमदसह ११ संशयितांपैकी आठ जणांवर पोलिसांच्या विशेष कक्षाने आरोपपत्र दाखल केले आहे.
१८० दिवसांचा वैधानिक कालावधी उलटूनही…
“आरोपी उमर फारूख, हसन अन्सारी आणि अर्शद खान यांना अटक करून १८० दिवसांचा वैधानिक कालावधी उलटूनही, त्यांच्याविरुद्ध या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. माझ्या मते, प्रकरणाचा पुढील तपास करण्याच्या तपास यंत्रणेच्या अधिकारांवर कोणताही निर्बंध नाहीत. पण, वैधानिक कालावधी संपल्यानंतर, आरोपी जामिनासाठी पात्र आहेत,” असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केल्यापासून ९० दिवसांच्या आत त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणे अपेक्षित असते, परंतु UAPA शी संबंधित प्रकरणांमध्ये हा कालावधी आणखी ९० दिवसांपर्यंत वाढवता येतो.
आरोपींचे वकील अबू बकर सबाक यांनी युक्तीवाद करताना म्हटले होते की, “त्यांच्या अशिलांविरुद्ध आरोपपत्र निर्धारित कालावधीत दाखल करण्यात आले नाही. आरोपी ऑगस्ट २०२४ पासून न्यायालयीन कोठडीत असूनही त्यांच्याविरुद्धची चौकशी अजूनही प्रलंबित आहे. त्यांना या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे.”