‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. ‘१०० ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माईंडस’ 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत. हे तीनही व्यवसायिक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत. यापैकी लक्ष्मी मित्तल हे ‘आर्सेलो मित्तल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे या यादीत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. ‘फोर्ब्स’ने त्यांचा उल्लेख ‘विक्रेता आणि विशेष गुण असलेला रिंगमास्टर’ असा केला आहे. याशिवाय, यादीमध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन, बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेटस आणि न्यूज कॉर्पोरेशनचे कार्यकारी अध्यक्ष रुपर्ट मरडॉक यांचाही समावेश आहे. ही यादी तयार करताना ‘फोर्ब्स’कडून काही निकष डोळ्यांसमोर ठेवण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवणाऱ्या आणि जगावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा विचार करण्यात आला. बीसी फोर्ब्स यांनी १७ सप्टेंबर १९१७ रोजी फोर्ब्स नियतकालिकाची सुरूवात केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 indians in forbes 100 greatest living business minds list