सिनेमागृहात राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहिल्याने ३ काश्मिरी विद्यार्थ्यांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. तिन्ही विद्यार्थी हे हैदराबादमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असून या तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
हैदराबादमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ओमर फियाझ, मुदबिर शब्बीर आणि जमीर गूल हे तिघे रविवारी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेले होते. मंत्रा मॉलमध्ये ते तिघे गेले होते. राष्ट्रगीत सुरु असताना हे तिघेही उभे राहिले नाही. सिनेमागृहात एक वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्याने या प्रकाराची माहिती सायबराबाद पोलिसांना दिली. सायबराबाद पोलिसांनी तिघांना अटक केली. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तिघांनाही काही तासांसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर जामिनावर तिघांची सुटका करण्यात आली. पोलीस चौकशीत हे तिन्ही तरुण मूळचे जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे उघड झाले.
सुप्रीम कोर्टाने सिनेमागृहात राष्ट्रगीतादरम्यान उभे राहणे बंधनकारक असेल असा निर्णय गेल्या वर्षी दिला होता. यानंतर डिसेंबरमध्ये केरळमधील चित्रपट महोत्सवात राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहिल्याने ६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी चेन्नईत अशोकनगरमधील कासी चित्रपटगृहात राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहिल्याने तीन जणांना मारहाण झाली होती. पीडितांमध्ये दोन महिलांचाही समावेश होता. २० जणांनी या तिघांना मारहाण केली होती.