संभल (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या संभल येथे मुगलकालीन मशिदीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना रविवारी हिंसक वळण लागले. क्षुब्ध जमाव आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांदरम्यान झालेल्या संघर्षामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.

संभल येथील मुगलकालीन शाही जामा मशिदीच्या जागेवर आधी हरिहर मंदिर होते असा दावा करणारी एक याचिका स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सर्वेक्षण करण्यात आले. तेव्हापासून या भागात तणाव वाढला आहे.

या हिंसाचारप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. त्या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) गुन्हे दाखल करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुरादाबादचे विभागीय आयुक्त आंजनेय कुमार सिंह यांनी माहिती दिली की, ‘‘नईम, बिलाल आणि नौमान नावाच्या तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या बंदूकधाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत.’’

हेही वाचा >>> अदानी’आरोपांच्या छायेत आजपासून संसद अधिवेशन; सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक

घटनेचे राजकीय पडसाद

● इंडिया आघाडी राज्यात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवीन कोहली यांनी केला.

●हा हिंसाचार म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुनियोजित कट असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला आहे.

●पोटनिवडणुकांमध्ये करण्यात आलेल्या गैरप्रकारांवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी सत्ताधारी पक्ष, सरकार आणि प्रशासनाने संभलमधील हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला.

नेमके काय घडले…

●रविवारी सकाळी मोठा जमाव मशिदीच्या बाहेर जमला. सर्वेक्षण पथकाने मशिदीत त्यांचे काम सुरू केल्यानंतर जमावाने गोळीबार सुरू केला.

●निदर्शकांनी वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला.

●समाजकंटकांनी गोळीबार केला आणि काही गोळ्या पोलिसांना लागल्या.

इंटरनेट सेवा खंडितखबरदारीचा उपाय म्हणून संभल तालुक्यात २४ तासांसाठी इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने सोमवारी १२वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली आहे.