नववर्ष स्वागतासाठी आता सगळेजण सज्ज होत असून यंदा गोव्यात यानिमित्त ३ लाख पर्यटक येण्याची शक्यता असून तेथील जवळपास सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाताळच्या पूर्वसंध्येपासूनच पर्यटकांनी गोव्यात पोहोचण्यास सुरुवात केली असून शेवटच्या दोन दिवसांत त्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढेल असा अंदाज सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. नववर्ष पूवसंध्येला गोव्यातील सर्वच किनाऱ्यांवर रात्रीच्या पार्टीचे आयोजन केले असून स्थानिक कॅथलिक जनतेनेही ठिकठिकाणी नववर्ष स्वागतासाठी पारंपरिक प्रार्थनांचे आयोजन केले आहे. नववर्ष पूर्वसंध्येला गोव्यात जवळपास तीन लाखहून अधिक पर्यटक येतील अशी शक्यता पर्यटन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. गेल्या वर्षी या पर्यटन मोसमात ३.८ दशलक्ष लोक गोवा भेटीवर आले होते. यंदा ४.८ दशलक्षपर्यंत ही संख्या पोचेल असा अंदाज गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केला. पर्यटन विभागातर्फे ठिकठिकाणी रोड शोज् आणि जनसंपर्क कार्यक्रम राबविला जात असून त्यामुळेच देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढत आहे, असेही ते म्हणाले.
गोव्यात सध्या राज्य सरकारतर्फे सनबर्न महोत्सव सुरू असून त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.